रविवार, १८ डिसेंबर, २०११

'सेशेल्स'मधील ड्रॅगनावतार

Ref - Maharashtra Times date. 18-12-2011


भारताभोवती 'ड्रॅगन'चा विळखा आणखी आवळत चालला आहे. सेशेल्समध्येही आता चीन नवा नाविक तळ उभारत आहे. या निमित्ताने चीनचा हिंदी महासागरातील वावर वाढणार आहे. याचा भारताच्या नाविक सामर्थ्याला असलेला धोका आपण तातडीने ओळखला पाहिजे.

........

चाचेगिरीपासून संरक्षण देण्यासाठी सेशेल्स बेटांनी चीनला आपल्या देशात नाविक तळ उभारण्यासाठी आमंत्रण दिले आणि चीनने केलेल्या 'एन्सर्कलमेंट'बाबत भारतात पुन्हा चर्चा सुरू झाली. सेशेल्स येथील नाविक तळ लष्करी नसून, त्याचा उपयोग प्रामुख्याने 'लॉजिस्टिक सपोर्ट'साठी केला जाईल, असा चीनचा दावा असला, तरी त्यांच्या म्हणण्यावर कितपत विश्वास ठेवायचा, हे १९६२ च्या युद्धानंतर भारताला चांगलेच उमगले आहे. चीनकडून आखण्यात येणारी सामरिक धोरणे प्रामुख्याने भारताला अडचणीत आणण्यासाठी आखली जात असतात. भारत मात्र त्याला योग्य प्रत्युत्तर देत नाही. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतेच 'चीन भारतावर आक्रमण करणार नाही,' असे विधान केले. त्यांचे उद्गार बरेच काही सांगून जातात. 'सेशेल्स' डावाने चीनचे अनेक मनसुबे पूर्ण होतील, तर दुसरीकडे भारताची डोकेदुखी मात्र वाढेल.

ड्रॅगनचा भारताभोवती विळखा

भारताच्या शेजारी देशांशी करार करून त्यांना आपल्या कह्यात घेण्याचे चीनचे धोरण नवे नाही. पाकिस्तानातील ग्वादार बंदराचा विकास, श्रीलंकेतील हंबनटोटा बंदर, बांगलादेशातील चितगाव बंदर, म्यानमारमधील क्याकफ्यू बंदराच्या विकासाचे कंत्राट चीनने मिळवले आहे. 'सेशेल्स'मुळे हिंदी महासागरात चीनचा प्रवेश होणार असून भारताबरोबरच अमेरिकेलाही तो एक प्रकारचा शह असणार आहे. अमेरिकेचा हिंदी महासागरात दिएगो गाशिर्या येथे नाविक तळ आहे. चीनच्या सेशेल्समधील उपस्थितीमुळे भारताबरोबरच अमेरिकेचे नौदलही चीनच्या रडारवर येईल. हिंदी महासागरातील चीनच्या अस्तित्वाला संयुक्त राष्ट्रसंघाबरोबर केलेल्या करारामुळे बळकटी मिळाली आहे. हिंदी महासागरातील 'पोलिमेटॅलिक सल्फाइड ओअर'चे उत्खनन करण्याचे १५ वर्षांचे अधिकार चीनकडे आहेत. त्यासंबंधीचा करार 'इंटरनॅशल सी-बेड ऑथॉरिटी'बरोबर चीनने याच वषीर् केला आहे. हिंदी महासागराच्या नैऋत्येला दहा हजार चौरस किलोमीटरच्या समुदी पट्ट्यातील उत्खननाचे अधिकार चीनकडे आहेत. अत्यंत योजनाबद्धतेने चीन हिंदी महासागरातील अस्तित्व दाखवून देत आहे.

' सेशेल्स'ची उपयुक्तता

आफ्रिकेपासून पूवेर्ला १,५०० किलोमीटर अंतरावर आणि मादागास्करच्या ईशान्येला असलेला ११५ बेटांचा समूह म्हणजे सेशेल्स देश. समुदी मार्गांचा विचार केला, तर भारत, चीनकडे येणाऱ्या बहुतेक व्यापारी मार्गांसाठी ही बेटे महत्त्वाची आहेत. तेलउत्पादक देशांपासूनही असणारे सान्निध्य त्यांचे सामरिक महत्त्व अधोरेखित करतात. शिवाय या देशातील अस्तित्वामुळे चीनचा मध्य पूवेर्तील देशांशी होणाऱ्या व्यापारातील अडचणी मिटण्याची शक्यता आहे. वरकरणी चाचेगिरीला रोखण्यासाठी चीनला आमंत्रण दिल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात तसे नाही. हिंदी महासागरात दिएगो गाशिर्यातील नाविक तळाची स्थापना करण्यापूवीर् अमेरिकेचीही सेशेल्समध्येच तळ असण्याची योजना होती; पण ती साध्य झाली नाही. चीनच्या संरक्षणमंत्र्यांनीदेखील 'लाँग डिस्टन्स मिशन'मध्ये लॉजिस्टिक सपोर्टसाठी या बंदरांचा उपयोग होईल, असे म्हटले आहे.

चीनच्या सेशेल्समधील घडामोडी या गेल्या चार-पाच वर्षांतील आहेत. चीनचे सेशेल्सशी २००७ पर्यंत फारसे संबंध नव्हते. २००७ मध्ये चीनचे अध्यक्ष हू जिंताओ यांनी या बेटांना भेट दिली. चीनच्या अध्यक्षांच्या या भेटीने चीनचे या बेटांकडे असलेले लक्ष अधोरेखित झाले. या महिन्याच्या सुरुवातीला चीनचे संरक्षणमंत्री जनरल लियांग गांग ली यांनी सेशेल्सला भेट दिली. या भेटीतच चाचेगिरी रोखण्यासाठी आपल्या बंदरांवर लष्करी तळ उभाण्याची विनंती सेशेल्सने चीनच्या संरक्षणमंत्र्यांना केली. चाचेगिरीविरुद्ध टेहळणीसाठी चीनने सेशल्सला दोन 'वाय-१२' विमाने भेट दिली आहेत. शिवाय २००४ मध्ये झालेल्या लष्करी करारानुसार तेथील ५० जवानांना चीनमध्ये प्रशिक्षण दिले जाते. सेशेल्सच्या विकासामध्ये भारताचाही हातभार कमी नाही. सेशेल्समधील जवानांना टेन करण्यासाठी भारताचाही पुढाकार राहिलेला आहे. चाचेगिरीविरोधात लढण्यासाठी 'डॉनिर्अर एअरक्राफ्ट,' दोन चेतक हेलिकॉप्टर्स आणि एक फास्ट अॅटॅक क्राफ्ट भारताने सेशेल्सला पुरवल्या आहेत. सेशेल्समधील व्हिक्टोरिया बेटाला भारताची लढाऊ जहाजे नेहमीच भेट देतात आणि चाचेगिरीविरोधात मोहीम राबवितात. भारताचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांनी गेल्या वषीर् या बेटांना भेट दिली होती.

चीनला फायदा

हिंदी महासागरामध्ये पाय रोवण्याची अनेक दिवसांची चीनची इच्छा सेशेल्समधील नाविक तळाने पूर्ण होईल. व्यापाराबरोबरच लष्करी फायदेही चीनला होतील. दिएगो गाशिर्यातील अमेरिकेच्या उपस्थितीलाही चीनचे सेशल्समधील अस्तित्व काटशह देणारे ठरणार आहे. आफ्रिकेमध्ये खाण तसेच पायाभूत सुविधांमध्ये चीनची बरीच गुंतवणूक आहे, त्याला या नाविक तळाचा निश्चितच फायदा होईल. याखेरीज अमेरिका, भारताच्या नौदलांवर लक्ष ठेवता येईल. तेलसंपन्न मध्य पूर्व देशांपासून आणि आफ्रिकेपासून समान अंतरावर असणाऱ्या या बेटांची तेल वाहून नेताना उपयोग होईल. संकटकाळामध्ये बऱ्याच अर्थाने उपयोगी पडेल, असे हे ठिकाण आहे.

भारताला धोका

चीनची पहिली विमानवाहू युद्धनौका नौदलात दाखल होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर सेशेल्समधील नाविक तळाच्या संमतीला विशेष महत्त्व आहे. कदाचित हवाई हद्दीचाही वापर करण्याची परवानगी दिली, तर त्याच्या परिणामांचाही विचार करावा लागणार आहे. हिंदी महासागरातील भारतीय नौदलाच्या दबदब्याला चीनच्या अस्तित्वामुळे काही प्रमाणात का होईना, शह बसणार आहे. चीनचे सेशेल्समधील अस्तित्व एक संकट म्हणूनच असणार आहे. या नाविक तळावरील उपस्थिती पाकिस्तानशी जवळीक वाढविणारीही ठरेल. चीन-पाकिस्तान यांची मैत्री सर्वश्रुतच आहे. त्यामुळे चीनच्या 'एन्सर्कलमेंट'ला भारताने वेळीच प्रत्युत्तर दिले पाहिजे. मालदीव, मादागास्कर, तसेच सेशेल्सबरोबर असलेल्या संबंधात वाढ करणे, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांच्याशी विशेष संबंध प्रस्थापित करणे यांसारख्या उपाययोजना भारत करू शकतो. चीनभोवती भारतानेही आपला विळखा मजबूत करणे गरजेचे आहे. भारताची राजकीय इच्छाशक्ती असेल, तर बरेच काही करता येण्यासारखे आहे.